लातूर - शहरातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत सिलिंडरचे तुकडे परिसरात १०० फुटापर्यंत उडाले. तर स्फोटामुळे २ जण जखमी झाले असून घरातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना शहरातील नवीन नांदेड नाका परिसरात राहणाऱ्या राहुल बाबुराव गंगने यांच्या घरात घडली आहे.
गंगने कुटुंबातील सर्व मंडळी मुलाच्या लग्नानिमित्ताने हैद्राबादला गेले होते. तेव्हा आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घरात ठेवलेल्या गँस सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. यामध्ये घरात असलेले कुलर, कपडे, इलेक्ट्रॉनिक मशीन, ड्रिल मशीन, कटर मशीन, पाण्याची विद्युत मोटार तसेच लग्नाच्या निमित्ताने घरात भरलेला किराणा सामान इत्यादी वस्तूंचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले.
स्फोटाची तीव्रता इतकी भयानक होती, की 100 फुटापर्यंत सिलिंडरचे तुकडे विखुरले गेले. त्यात शेजारच्या घरातील बाथरूमच्या दारावर सिलिंडर जाऊन आदळल्याने दार तुटले. तसेच गगनेंच्या घरापासून काही अंतरावर उभ्या असलेल्या शेख रहमुना यांच्या पाठीवर व हातावर सिलिंडरच्या तुकड्यांचा मार लागला. त्यामध्ये त्या जखमी झाल्या आहेत. तर शेजारील श्रीकांत सौदागर हे घरातून धूर का येत आहे, हे पाहण्यासाठी घराचा दरवाजा उघडला असता, सिलिंडरचा स्फोट होऊन त्याचेंही हात भाजले आहेत.