लातूर - शहरातील गणेश मंडळांनी आपल्या मूर्ती विसर्जित न करता त्या मूर्तीकारांना परत कराव्या, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते. या आवाहनाला गणेश मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मंडळांनी शहरानजीकच्या कोळपा गावात तब्बल 30 हजाराहून अधिक गणेश मूर्तींचे संकलन केले आहे. लवकरच या मूर्ती मूर्तीकारांना दिल्या जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.
हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये 28 हजार मूर्तीदान; रात्री उशिरापर्यंत होणार ५० हजार मूर्तीदान
जिल्ह्यात पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाल्याने गणेश मंडळांना गणेश मूर्तींचे विसर्जन करावे कुठे? असा प्रश्न निर्माण झाला होता. पण जिल्हा प्रशासनाने आणि शहरातील गणेश मंडळांनी एकत्र येत यंदा मूर्तींचे विसर्जन न करता मूर्तीदान करण्याचा निर्णय घेतला. शहरातील सर्व मंडळांनी या निर्णयाला सहमती दिल्यानंतर कोळपा गाव शिवारात तब्बल 30 हजार गणेश मूर्तींचे संकलन करण्यात आले. यावेळी शहरालगतच्या ग्रामीण भागातील गणेश मंडळांनीही मूर्ती संकलन करण्यावर भर दिला. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या या संकल्पनेचे सर्वत्र कौतुक होत आहे. सध्या हा नवा लातूर पॅटर्न झाला असल्याच्या भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
हेही वाचा - परभणीत महापालिकेच्या कृत्रिम हौदावर 'श्रीं'च्या विसर्जनासाठी गर्दी
गणेश मूर्ती संकलन केलेल्या मंडळाची नोंद जिल्हा प्रशासनाने केली आहे. या मंडळांना प्रशासनाकडून प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पाणी संकट आले तरी या उपक्रमांतून एक नवा मार्ग येथील गणेश मंडळ आणि जिल्हा प्रशासन अवलंबला आहे.