लातूर - जिल्ह्यातील जलसिंचनाच्या ठिकाणी आतापर्यंत मगरीचा वावर एकदाही आढळून आलेला नाही. मात्र, चक्क विहिरीतच मगर आढळून आल्याने अहमदपूर तालुक्यातील थोट सावरगाव शिवारात एकच खळबळ उडाली होती. सर्पमित्र सिद्धार्थ काळे व महेंद्र गायकवाड यांच्या तत्परतेमुळे आणि वनविभागाच्या सहकार्याने विहिरीतील मगर बाहेर काढण्यात यश आले आहे.
जिल्ह्यातील थोट सावरगावाला लागून असलेल्या तळ्यात मगरीचा वावर असल्याची चर्चा गेल्या दोन वर्षांपासून होती. मात्र, तळ्यातील मगर जेव्हा बालाजी मंदे यांच्या शेतामधील विहिरीत आढळून आली, तेव्हा परिसरातील नागरिकामध्ये घबराट निर्माण झाली होती. विहिरीत मगर असल्याची माहिती मंदे यांनी सर्पमित्र सिद्धार्थ काळे व महेंद्र गायकवाड यांना दिली होती. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी धाव घेतली होती.
मंगळवारी दुपारी तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर या मगरीला बाहेर काढण्यात यश आले. सेफ्टी बेल्टचा वापर करून सिद्धार्थ काळे यांनी इतरांच्या मदतीने मगरीचे प्राण वाचवले तर शेतकऱ्यांच्या मनातील भीती दूर केली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मगरीला ताब्यात घेऊन निसर्गाच्या सानिध्यात सोडले.