लातूर - औसा तालुक्यातील हरेगाव येथे आज सकाळी अचानक उच्च दाबाने वीजपुरवठा झाल्याने किराणा दुकानाला आग लागली. आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु; 3 लाख रुपयांच्या किराणा साहित्याची राखरांगोळी झाली आहे.
तालुक्यातील हरेगाव येथे नामदेव कोहाळे यांचे किराणा दुकान आहे. शनिवारी सकाळी 8 च्या दरम्यान उच्च दाबाने वीजपुरवठा झाला आणि शॉर्ट सर्किट होऊन किराणा दुकानाला आग लागली. आगीमध्ये दुकानातील किराणा साहीत्य तसेच रेफ्रीजरटेर, मीक्सर, लाकडी फर्णीचर आणि इतर इलेक्ट्रॉनीक उपकरणे जळून खाक झाली आहेत. जवळपास 3 लाख रूपयांच्या साहीत्याचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र, तोपर्यंत दुकानातील साहित्य जळून खाक झाले होते. गावचे तलाठी फडणवीस, ग्रामसेवक राजेगावे व सरपंच अरविंद कोहाळे यांच्या उपस्थितीत घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.
वीज महावितरणने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी दुकानदार नामदेव कोहाळे यांनी केली आहे.