लातूर - जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जिल्ह्यातील प्रत्येक गावात ग्रामपंचायतीमार्फत गावाचे संरक्षण करण्यासाठी अँटीकोरोना फोर्सची निर्मिती करण्याचे सरपंच आणि पोलीस पाटील यांना आदेश दिले होते. त्याप्रमाणे गावांमध्ये अँटीकोरोना फोर्सची स्थापना करण्यात आली. निलंगा तालुक्यातील आनंदवाडी अ. बु. येथील अँटीकोरोना फोर्सच्या सदस्याला गावातील दोघांनी शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली. त्यामुळे निलंगा पोलिसांनी दोघांना दाखल करून अटक केली आहे.
परजिल्ह्यातील आणि बाहेर गावावरून येणाऱ्या लोकांची अँटीकोरोना फोर्सकडून कसून चौकशी सुरू केली जाती. गाव तिथे चेक पोस्ट निर्माण झाल्यामुळे गावात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या नोंदी होऊ लागल्या. अनेक गावात मुंबई पूणे आणि परराज्यातून चोरून येणाऱ्या लोकांची कसून चौकशी वाढली. त्यामुळे काही प्रमाणात बाहेरून ग्रामीण भागातील येणाऱ्या लोकांचे लोंढे कमी झाले.
निलंगा तालुक्यातील आनंदवाडी अ. बु. येथील अँटीकोरोना फोर्सचे ताहेर बिराजदार हे आपले कर्तव्य बजावत होते. यावेळी गावातील राम हारडे आणि बस्वराज रंडाळे हे दोघे चेक पोस्टवर येऊन तुम्ही चौकशी करायची गरज नाही. गावात लोकांना येऊ द्या तुम्ही कोणालाही अडवायची गरज नाही. गावात जायच्या रस्त्यावर दोरी लावायची गरज काय? असा प्रश्न विचारत बिराजदार यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर यासंबंधी तक्रार निलंगा पोलिसात देण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल चोरमले हे करत आहेत.