लातूर- जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता 15 दिवसाचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.त्याच्या अंमलबजावणीला आजपासून सुरवात झाली आहे.केवळ अत्यावश्यक सेवा वगळता रस्त्यावर कोणी आढळल्यास त्यावर कारवाई केली जात आहे. यामुुळे रस्त्यावर फक्त पोलीस दिसत आहेत.शहरासह जिल्ह्यात हीच अवस्था असून वाढत्या रुग्णासंख्येची साखळी तोडण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 700 पेक्षा अधिक आहे. शिवाय दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या बैठकीत झालेल्या निर्णयावरून 15 दिवसांचा लॉकडाऊन असणार आहे. यामध्ये सुरवातीच्या पाच दिवसात कडक अंमलबजावणी होणार असून केवळ मेडिकल दुकान आणि दूध विक्रेते यांनाच परवानगी देण्यात आली आहे.
21 जुलै पर्यंत किराणा दुकान देखील बंद राहणार असून त्यांनतर घरपोच सेवा दिली जाणार आहे. आज सकाळी शहरातील चौकाचौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून विनाकारण रस्त्यावर येणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी चौक, गंजगोलाई या भागात कमालीचा शुकशुकाट पाहवयास मिळाला आहे.
पंधरा दिवसाच्या लॉकडाऊनंतर कोरोनाबाधित रुग्णांची साखळी तोडण्यात यश येईल, असा प्रशासनाचा मानस आहे. शहरासह ग्रामीण भागात रुग्णांची संख्या वाढत आहे.त्यामुळेच पुन्हा लॉकडाऊन करण्याची मागणी सर्वसामान्य जनतेमधून होत असताना दोन दिवसांपूर्वी लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला होता. दोन टप्प्यात होणाऱ्या या लॉकडाऊनला बुधवारपासून सुरवात झाली आहे.