लातूर - उदगीर शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशात आता नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. गेल्या दोन दिवसात उदगीर सामान्य रुग्णालयातून 15 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ही बाब उदगीर शहरासाठीच नाही, तर लातूर जिल्ह्यालाही दिलासा देणारी आहे.
बुधवारी 5 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांनी कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना टाळ्या वाजवून रुग्णालयातून निरोप दिला. उदगीर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 29 वर गेली होती. यामध्ये 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. तर इतर 28 जणांवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते.
सोमवारी उदगीरमधील 11 तर बुधवारी 5 रुग्ण हे ठणठणीत बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे सध्या केवळ 13 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बुधवारी 3 जणांचे अहवाल तपासणीसाठी आले होते. हे सर्व निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे, एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. तर, दुसरीकडे रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतत आहेत. लातूरकरांसाठी ही दिलासादायक बाब असून उदगीर येथील दोन कंटेन्मेंट झोनमध्ये अजूनही दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे