लातूर - गेल्या चार दिवसांपासून जिल्हा परिषदेसमोर योगवाशिष्ठ शिक्षण प्रसारक मंडळांतर्गत असलेल्या तिन्हीही विद्यालयातील शिक्षकांनी आमरण उपोषण सुरू केले होते. यावेळी मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने येथील महिला शिक्षकांनी शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली जामदार यांच्या कक्षात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. तनुजा गंभीरे आणि विरंगना चामे, अशी आत्मदहनाचा प्रयत्न केलेल्या शिक्षकांची नावे आहेत. या दोन्ही शिक्षकांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
योगवाशिष्ठ शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळांमध्ये संस्थासचिव रामदास पवार यांचा मनमानी कारभार होत असून अधिकतर पदावर नातेवाईकांचा समावेश करण्यात आला आहे. तर शाळेच्या इमारतीसाठी शिक्षकांकडून घेतलेले पैसे परत करावेत, रंगकामासाठी प्रत्येक शिक्षकाकडून घेतलेले 28 हजार रुपये परत करावे, शिवाय महिला शिक्षकांना आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल संस्थासचिव व त्यांचा मुलगा किरण पवार यांच्यावर गुन्हा दाखल करावा, नियमित पगार देण्यात यावा, या मागणीसाठी 9 सहशिक्षकांसह 1 मुख्याध्यापक आणि 6 सहशिक्षकांनी उपोषण सुरू केले आहे.
यापूर्वीही काही शिक्षकांनी या संस्थाचालकाविरोधात तक्रार नोंद केली आहे. मात्र, कारवाई न झाल्याने पुन्हा या कर्मचाऱ्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. आता याप्रकरणी शिक्षणाधिकारी बिपीन इटनकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन मागण्या पूर्ण करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
शिक्षणाधिकाऱ्यांची उलटी 'शाळा'-
गेल्या 4 दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या समोर उपोषणास बसलेल्या शिक्षकांना अधिकारी भेट देत नसल्याने मागण्यासंदर्भात संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे आज हे टोकाचे पाऊल उचलले असता मागण्या वेळेत पूर्ण का झाल्या नाहीत? याचा जाब न विचारता 4 दिवसांपासून उपाशी असलेल्या उपोषणकर्त्यांचीच मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी चौकशी सुरू केली. शिवाय असे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी तंबीही मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन इटनकर यांनी दिली आहे.