लातूर - जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. अहमदपूर तालुक्यातील धसवाडी येथील मध्यम प्रकल्पात मासेमारीसाठी गेलेल्या आंधोरी गावातील पितापुत्राचा बुडून मृत्यू झाला आहे.
अहमदपूर तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नदी- नाले तुडुंब भरून वाहत आहेत. असे असताना आंधोरी गावातील रजाक रशीद शेख (वय 45 वर्षे) व त्यांचा मुलगा शहीद शेख (वय 12 वर्षे) हे मासेमारी करण्यासाठी धसवाडी मध्यम प्रकल्पात गेले होते. दरम्यान, सोमवारी (दि. 20 जुलै) या परिसरात पावसाने हजेरी लावली होती. हा मध्यम प्रकल्प लेंडी या नदी पत्रातूनच जातो. पावसामुळे लेंडी नदीला पूर आला व मध्यम प्रकल्पातील पाणी वाढले. मासेमारी करत असताना रजाक शेख यांचा पाय घसरला व ते वाहत्या पाण्यात पडले. त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करताना शहीदही पाण्यात पडला होता. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने त्यांना पोहता आले नाही. यामध्येच दोघांचाही मृत्यू झाला आहे.
दरम्यान, शहीद याचा मृतदेह लेंडी नदीच्या पुलावरच अडकलेल्या अवस्थेत आढळून आला तर रजाक यांचा मृतदेह अतुल गुंडरे यांच्या शेतातील नदीपात्रात आढळून आला आहे. मोहन राजपाल पाटील व बाबुराव शिंगाडे यांना हे मृतदेह आढळून आले. गावकऱ्यांच्या मदतीने त्यांनी मृतदेह बाहेर काढले.
किनगाव पोलीस ठाण्यात पोलीस पाटील यालबाजी नलवाड यांच्या अर्जावरून घटनेची नोंद झाली आहे. पितापुत्राचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने आंधोरी गावात शोककळा पसरली आहे.