लातूर - खरीपातील पिके अंतिम टप्प्यात असताना जिल्ह्यात अतिवृष्टीने सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आता रब्बीतील पिके बहरात असताना झालेल्या पावसामुळे रब्बीतील गहू, हरभरा या पिकांना धोका निर्माण झाला आहे.
उत्पादनाच्या दृष्टीने खरीप हंगामाच शेतकऱ्यांसाठी महत्वाचा आहे. पण यंदा पावसामुळे आणि कोरोनाने ओढवलेल्या परस्थितीने पिकांचे आणि फळबागांचे नुकसान झाले होते. पण रब्बीसाठी पोषक वातावरण झाल्याने सरासरीपेक्षा अधिकच्या क्षेत्रावर रब्बीचा पेरा झाला होता. पण पिके बहरात असतानाच बुधवारी रात्री निलंगा तालुक्यातील निटूर, देवणी या ठिकाणी पाऊस बरसला आहे. त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव निर्माण झाला आहे तर वाढीवरही परिणाम होणार आहे.
हरभरा पीक धोक्यात-
रब्बीत हरभरा पिकाची सर्वाधिक लागवड झाली आहे. पीक फुलोऱ्यात असतानाच वातावरणातील बदल आणि तुरळक ठिकाणी झालेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे. यापूर्वी खरिपातील नुकसान आणि आता रब्बीत होत असलेल्या नुकसानीमुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.
सुरक्षित ठिकाणी पिकांची साठवणूक करावी-
गेल्या तीन ते चार दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. यातच निलंग्यासह देवणी तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे. कांद्याची काढणी सुरू असतानाच पावसाने हजेरी लावल्याने कांद्याचे नुकसान होत आहे. त्यामुळे कांदा सुरक्षित ठिकणी साठवण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.