लातूर - कर्जाची परफेड नियमित करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. ही रक्कम त्वरित द्यावी, या मागणीसाठी शेतकरी संघटना आणि बहुजन रयत परिषेदेच्या वतीने लातूर जिल्हाधिकारी कार्यासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. यावेळी फिजिकल डिस्टन्सचे पालन करण्यात आले होते.
राज्य सरकारने केलेल्या कर्जमाफीचा लाभ केवळ थकबाकीदार शेतकऱ्यांना झाला आहे. अनेक शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंतचे कर्ज माफ झाले आहे. मात्र, नियमित कर्ज भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना अद्यापही प्रोत्साहनपर देण्यात येणारी 50 हजारांची रक्कम खात्यावर जमा केलेली नाही. शिवाय याबाबतची प्रक्रिया अद्याप सुरूही झालेली नाही. कर्जमाफीचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरून बँकांना आणि सरकारला दिलासा दिला, ते शेतकरी वंचितच राहिले असल्याचे आंदोलक शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... विठ्ठला, राज्यासह जगाला कोरोनामुक्त कर; मुख्यमंत्र्याचे विठ्ठलाला साकडे
त्यामुळे राज्य सरकारने या शेतकऱ्यांना 50 हजाराची रक्कम देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याची मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे राजेंद्र मोरे, राजीव कसबे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. त्यानंकर आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना दिले. शिवाय मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशाराही यावेळी आंदोलक शेतकऱ्यांकडून देण्यात आला.