लातूर - नापिकी आणि कर्जबाजारीपणा या कारणांमुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. रविवारी सकाळी शिरुरांतपाळ तालुक्यातील डिगोळ येथे कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केली होती, तर रात्री देवणी तालुक्यातील अनंतवाडी येथील रमेश अण्णाराव शेळके यांनीही वाढत्या कर्जाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षी शेती उत्पादनात घट होत आहे. त्यामुळे बँकेच्या कर्जाची परतफेड कशी करावी या विवंचनेत रमेश शेळके हे होते. रविवारी रात्री उशिरापर्यंत ते घराकडे परतले नसल्याने त्यांची शोधाशोध सुरू झाली. शेवटी बालाजी आराध्ये यांच्या शेतामधील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.
शिरुरअंतपाळ तालुक्यातील शेतकऱ्यानेही विहिरीत उडी घेऊनच जीवन संपवले होते. रमेश शेळके अल्पभूधारक शेतकरी होते व कोरडवाहू शेती करत होते. त्यांच्यावर बँकेच्या कर्जासह इतर खासगी कर्जही होते. महिना भरापासून ते अस्वस्थ दिसत होते, असे परिवारातील सदस्यांकडून सांगण्यात आले. दोन नोव्हेंबर पासून ते बेपत्ता होते. त्यांचा सगळीकडे शोध चालू होता. त्याच दरम्यान त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.