लातूर - सततची नापिकी आणि मुलीच्या लग्नाची चिंता यातून कन्हेरी येथील शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
सुरेश संदिपान झिरमिरे (४५, कन्हेरी, ता, औसा) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सुरेश यांना ३ एकर कोरडवाहू जमीन आहे. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे दिवसेंदिवस उत्पादनात घट झाली होती. शिवाय त्यांच्याकडे बँकेचे कर्जही होते. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा आणि मुलीच्या लग्नाची चिंता. यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी शनिवारी रात्री घरी कुणी नसताना आडूला गळफास घेतला.
झिरमिरे यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा, असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरूषच गेल्याने कुटुंबाच्या समस्येत वाढ झाली आहे. रात्री उशिरा औसा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला असून आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.