लातूर - राज्यातील चारही कृषी विद्यापीठे, त्या त्या विभागातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी कार्यरत आहेत. शेती संबंधित विविध संशोधने करून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करणे, हे त्या विद्यापीठांचे सर्वांत महत्वाचे काम. मात्र, जेव्हा याच विद्यापीठातील संशोधन बाद ठरते, त्यावेळी विद्यापीठाबरोबरच शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान होते. असाच प्रकार परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या सोयाबीन पिकाच्या प्रसिद्ध एमएयुएस-७१ या वाणाबाबत झाला आहे. हे वाण महाबीजने दिलेल्या अहवालात नापास ठरले आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या बीज संशोधनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हेही वाचा... अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळामध्ये भ्रष्टाचार झाला.. रोहित पवारांची चौकशीची मागणी
आजनी गावच्या परमेश्वर गुरमे या शेतकऱ्यानी खरिप हंगामात आपल्या शेतात एमएयूएस-७१ या वाणाच्या १३ बॅग बियाणांची पेरणी केली. पिकाच्या उगवणी नंतर पीक फुलोऱ्यात येण्याच्यावेळी पीक वेगळ्या प्रकारच्या जातीचे असल्याचा गुरमे यांना संशय आला. त्यानंतर त्यांनी प्रथम तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. त्यांच्याकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने जिल्हा कृषी अधिकारी व जिल्हा अधिकारी यांच्याकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर महाबीजचे जिल्हा अधिकारी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरमे यांच्या शेतात जाऊन वेगवेगळ्या दोन पथकांद्वारे पाहणी केली. पंचनामा केला. त्यावेळी तक्रारदार शेतकरी गुरमे यांना महाबीजकडून सदरील वाणात ५० टक्के भेसळ असल्याचा अहवाल देण्यात आला. त्यामुळे या वाणाची पेरणी केलेल्या जिल्ह्यातील ७० टक्के शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
हेही वाचा... वन कर्मचाऱ्यांच्या अंगावर वाळू तस्करांनी घातला ट्रॅक्टर; पाच जणांना अटक
सरकारी यंत्रणेद्वारे आम्हाला हे बियाणे मिळाले आणि आता यात भेसळ असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे सरकारच जर शेतकऱ्यांना असे बियाणे देऊन फसवत असेल, तर हे दुर्दैव आहे. त्यामुळे विद्यापीठ दोषी की, महाबीज दोषी याचे आम्हा शेतकऱ्यांना काही देणे-घेणे नाही. मात्र, सरकारनेच आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी परमेश्वर गुरमे यांनी केली.