लातूर - अतिवृष्टीमुळे खरिपातील सोयाबीन या मुख्य पिकाचे मोठे नुकसान झाले होते. एवढेच नाही तर अनेकांच्या जमिनीही वाहून गेल्या आहेत. नैसर्गिक संकटानंतर शासनाची भरघोस मदत मिळेल असा आशावाद होता पण झाले उलटेच. पंचनामे करण्यातही अनियमिता आढळून येत आहे. त्यामुळे खरे लाभार्थी वंचित राहत असून कागदोपत्री नुकसान दाखविण्यात आलेल्या बोगस शेतकऱ्यांनाच लाभ मिळताना दिसत आहे. त्यामुळे औसा तालुक्यातील कारला गावच्या 36 शेतकऱ्यांनी आत्मदाहणाचा इशारा दिला आहे.
खरिपाचे पीक अंतिम टप्प्यात असताना जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. यामुळे सोयाबीन, उडीद या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिसकावून घेतला होता. उभी पिके आडवी झाली होती तर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही झाले होते. यावर सरकारने पंचनामे करण्याचे निर्देश दिले. मात्र, स्थानिक पातळीवर अधिकारी आणि कर्मचारी यांनी मिलिभगत करून काही मोजक्याच नागरीकांचे पंचनामे करून घेतले. औसा तालुक्यातील 36 शेतकरी आता नुकसानग्रस्तांच्या यादीत नाव नसल्याने संतप्त झाले आहेत. पावसामुळे भविष्यात किमान 5 ते 6 वर्ष पिक घेणे अवघड झाले आहे. असे असताना ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांनी काही मोजक्याच शेतकऱ्यांचे पंचनामे करून घेतले आणि अनेकांची नावे यातून वगळली. आता नुकसंग्रस्तांच्या याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. यामध्ये कारला गावातील 100 शेतकऱ्यांचे नावच नाही. त्यामुळे त्यांनी नुकसानभरपाई मिळाली नाही तर आत्मदाहणाचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता प्रशासन काय निर्णय घेणार हे पाहावे लागणार आहे.
गावस्थरावर अधिकारी कर्मचाऱ्यांची मनमानी -
खरीप हंगामातील पिके पाण्यात असताना किमान पंचनामे तरी व्हावेत ही अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत होते. मात्र अधिकारी आणि कर्मचारी यांनी गाव पुढाऱ्यांना हाताशी धरून काही मोजक्याच शेतकऱ्यांचे पंचनामे करून घेतले. त्यामुळे खऱ्या अर्थाने ज्यांचे नुकसान झाले आहे ते शेतकरी मदतीपासून वंचितच आहेत. त्यामुळे यादीतील बोगस नावे बाजूला करून मदत देण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.