लातूर - गेल्या ८ दिवसांपासून निलंगा देवणी शिरूर अनंतपाळ तालुक्यासह लातूर जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने कहरच केला आहे. हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांच्या तोंडातून हिरावून घेतला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी पीक नुकसानीची पाहणी केली. यावेळी 'साहेब आम्ही जगावे का मरावे? असा सवाल शेतकरी सलीम पटेल यांनी विचारला आणि त्याला रडू कोसळले. यावेळी पालकमंत्र्यांनी त्याची समजूत काढत त्याला प्रेमाने जवळ घेतले.
निलंगेकरांनी निलंगा मतदारसंघातील अनेक गावातील पीक नुकसानीची पाहणी केली. यावेळी अंबुलगा बु. येथील शेतकरी सलीम युसुफ पटेल यांनी कोंब फुटलेले सोयाबीन हातात घेऊन साहेब आम्ही जगावे की मरावे? असा सवाल केला. यावेळी त्याला रडू कोसळले. त्यानंतर निलंगेकरांनी त्या शेतकऱ्याची समजूत काढली.
पीक विमा वर्षाला भरतो. मात्र, ४०० नाहीतर ५०० रुपये मिळतात. काय करावं सांगा? प्रत्येक वर्षाला पावसाचे असेच आहे. निसर्गाचा लहरीपणा आमच्या शेतकऱ्यांच्या अंगावर येत आहे. लेकरांचे लग्न करायचे आहेत. दहा लाख रूपये बाकी झाले. कोणताच सावकार दारात उभा राहू देत नाही. आता फाशी घ्यायची वेळ आलीय साहेब, आम्ही जगावे कसे? असा सवाल शेतकरी सलिम पटेल यांनी केला.
तुम्ही चिंता करू नका. शासन तुमच्या पाठीशी आहे. काळजी करू नका, असे सांगत निलंगेकरांनी शेतकऱ्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. तसेच उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. तसेच जिल्हा अधिकारी जी. श्रीकांत यांनी सरसकट पंचनामे करून १०० टक्के नुकसान भरपाईचे पंचनामे करण्यास सांगितले.
निलंगेकरांनी निलंगा मतदार संघातील औराद, हालगरा, अंबुलगा बु., वलांडी, धनेगाव, जवळगा, निटूर, देवणी, शिरूर अनंतपाळ येथील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी केली.