लातूर - जिल्ह्यासह सीमावर्ती भागात आज (रविवारी) बळीराजाचा ( Farmers ) महत्वाचा सण साजरा करण्यात आला. कोणत्याही पुराणात किंवा इतिहासात नसलेला मात्र शेकडो वर्षाची परंपरा असलेला बळीराजाचा सण म्हणजे 'येळवस' अर्थात वेळ आमावस्या ( Vel Amavasya ). यावर्षी या सणावर कोरोनाचे सावट असल्याने प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर हा सण साजरा करण्यात आला.
- अशी करण्यात आली तयारी
वेळ अमावस्या सणाची तयारी करताना चार दिवस अगोदर साधनाची जमवा-जमव सुरु होते. त्यात तुरीच्या शेंगा, चवळी, भुईमूग हा सगळा रानमेवा जमा होतो. वेळ अमावस्याच्या दिवशी पहाटे घराघरात चूल पेटते. बेसन पिठात कालवून चिंच आणि अंबिवलेल्या ताकाच्या पाण्यावर उकडलेले पदार्थासह शिजवलेली भाजी म्हणजे भज्जी. ही भज्जी म्हणजे अफलातून भाजी.
![उस्मानाबादमध्ये वेळ अमावस्या साजरी करतांना शेतकरी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/14075296_l.jpg)
यासोबत दिले जाणारे अंबील म्हणजे चार दिवसाचे ताक ज्वारीच्या पिठात अंबवून जिरा फोडणी दिलेल हे पेय जे तांब्यावर तांबे रिचवले तरी प्यायची इच्छा होते ते अंबिल. भल्या थोरल्या भाकरी. गव्हाची खीर एका शेतात २० ते २५ लोक जेवतील एवढा स्वयंपाक वाजत-गाजत घरातून डोक्यावरुन शेतावर निघतो. एका शेतात खाल्लेली 'येळवस' दुसऱ्या शेतात जाऊन खाण्यासाठी ते जिरावं म्हणून प्रत्येक कोपीच्या पुढे झोका बांधला जातो.
![युवा शेतकरी उस्मानाबाद](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/14075296_la.jpg)
- काय आहे परंपरा?
भारतीय व्दिपकल्पात सिंधू संस्कृतीपासून नदीचे जल पुजन करण्याची परंपरा चालत आलेली आहे. गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधु आणि कावेरी या त्या सात नद्या ( सप्त सिंधु ) भारतीय लोक परंपरेत अतिशय पवित्र समजल्या जातात. त्यामागे त्यांच्या प्रती असलेली कृतज्ञता होती. त्याच सप्तसिंदु मातृका म्हणून पुजण्याची परंपरा सुरु झाली. पुढे पिण्याच्या पाण्याच्या विहिरी खोदल्यानंतर त्यामधील जल हे या सप्त सिंधुचे प्रतिक म्हणून पुजल्या जावू लागले. विहिरीच्या जवळ प्रतिकात्मक सात दगड पुजण्याची परंपरा आहे. तीला लातूर जिल्ह्यात आसरा म्हणून ओळखले जाते.
![उस्मानाबाद येथील छायाचित्र](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/14075296_latur.jpeg)
आसरा म्हणजे तुच आमची राखण करणारी, सहारा देणारी, पाणी पाजणारी. याच आसराची पुजा वेळा अमावस्येच्या दिवशी प्रत्येक शेतात मस्त ज्वारीच्या कडब्याच्या पेड्यांची कोप करुन भक्ती भावाने केली जाते. सकाळी पूजा करुन आणि हा सगळा सुग्रास भोजनाचा भोज चढवून मोठी पंगत बसते. यावर्षी कोरोना संकट असल्यामुळे प्रशासनाच्या निर्बंधाचे पालन करत ही वेळ अमावस्या जिल्ह्यासह परिसरात मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली.
हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष : अन् कोल्हापुरातल्या हुपरीमध्ये गायींच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम