लातूर - निसर्गाची अवकृपा, राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष आणि विमा कंपन्यांचा मनमानी कारभार शेतकऱ्यांच्या जीवावर बेतत आहे. यंदाच्या हंगामातील खरीप धोक्यात असल्याने शेतकऱ्यांना भविष्याची चिंता लागली आहे. दुसरीकडे गतवर्षीचे रब्बी पीक विमा पदरी न पडल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. हीच अवस्था आहे औसा तालुक्यातील आलमला गावच्या शेतकऱ्यांची. या गावच्या त्रस्त शेतकऱ्यांनी आज थेट विमा कंपनी गाठली अन ठिय्या दिला.
खरीप हंगामावर पावसाची अवकृपा राहिल्याने या हंगामातील सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्येच औसा तालुक्यातील आलमला गावच्या शेतकऱ्यांना आद्यपही रब्बीचा पीकविमा मिळालेला नाही. गावचे क्षेत्र ५ हजार एक्कर असून रब्बीत हरभरा हे प्रमुख पीक घेतले जाते. पिके धोक्यात असल्याने गावातील १ हजार २०० शेतकऱ्यांनी पिकविम्यापोटी ११ लाख रुपये अदा केले. मात्र, पीक विमा आणि कृषी विभागाच्या मनमानी कारभारामुळे या गावचे शेतकरी विमा रक्कमेपासून वंचित राहिले आहेत. केवळ २० शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला तो हि अदा केलेल्या रकमेपेक्षा कमी. यामुळे संतप्त गावच्या शेतकऱ्यांनी आज लातूर येथील बजाज आलियान्झ कार्यालय गाठून ठिय्या दिला.
रब्बी विमा तात्काळ द्यावा या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले होते. शिवाय विमा भरून घेतल्यासंदर्भात कोणतीही माहिती या शाखेत नसल्याने विमा कंपनीच्या कारभाराबद्दल संशय व्यक्त होत आहे. एकीकडे निवडणुकांच्या लगबगीत राजकीय नेत्यांची लगीनघाई सुरु आहे, तर दुसरीकडे जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने दाद कुणाकडे मागावी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. यावेळी मनसेचे संतोष नागरगोजे यांनी शेतकऱ्यांच्या वतीने बँकेच्या व्यवस्थापकाना निवेदन दिले.