लातूर - कारखान्यावर ऊस घालून सहा महिन्याचा कालावधी लोटला आहे. तरी एक रुपयाही शेतकऱ्यांना देण्यात आला नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी येथील साईबाबा बँकेत ठिय्या मांडला. मात्र, शेतकऱ्यांचे गऱ्हाणे ऐकून न घेता बँक अधिकाऱ्यांनी बँकेतूनच पळ काढला. एकीकडे शेतकरी दुष्काळाशी सामना करीत आहेत. तर दुसरीकडे कारखान्याकडूनही त्यांची हेळसांड होत आहे.
लातूरसह बीड जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी औसा तालुक्यातील बोन्द्री येथील साईबाबा साखर कारखान्यावर ऊस घातला होता. ऑक्टोबर ते जानेवारीपर्यंत या कारखान्याचे गाळप सुरु होते. गाळप होताच आठवड्याभरात उसाचे बिल दिले जाणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सहा महिने उलटूनही कारखाना आणि संबंधित बँकही टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे बोन्द्री, नळेगाव, राजेवाडी, हासेगाव वाडी, धानोरा बुद्रुक, मसोबावाडी, बोंबळी, बेलगाव, लोदगा, मुगाव, सोनचिंचोलीसह बीड जिल्हयातील शेतकऱ्यांनी बँकेतच ठिय्या दिला होता.
खरीप हंगाम तोंडावर आला आहे. पेरणीसाठी तरी कारखान्याने बिले अदा करावेत शिवाय मुलांच्या शैक्षणिक फीस साठीही अडचणी निर्माण होत आहेत. हातात हक्काचा पैसा पडत नाही यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सकाळ पासून शेतकरी तेथे बसले होते. मात्र, हातात आश्वासनापलीकडे काहीच पदरी पडत नाही. या कारखान्याकडे कोट्यवधी थकीत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.