लातूर - अजमल कसाब आणि त्याचा सहकाऱ्याचा अंधाधुंद गोळीबार सुरू होता. त्याच दरम्यान मंत्रालयाकडे बोलावणे आले. मंत्रालयात जात असताना समोरच कसाब आणि त्याचा साथीदार आले. मी त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला मात्र, तो फसला. त्यानंतर त्यांनी माझ्यावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. यात माझ्या हाताचे बोट तुटले आणि कमरेला गोळी लागली. ते माझ्या मृत्यूची खातरजमा करण्यासाठी गाडीकडे येत असल्याचे मला दिसले. रक्तबंबाळ हात डोक्यावर ठेऊन मी मृत झाल्याचे नाटक केले... ही गोष्ट आहे 26/ 11 च्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या मारूती फड यांची. यांच्याच साक्षीने दहशतवादी अजमल कसाब फासावर लटकला.
मंत्रालयात काम करणारे मारूती फड हे 26 नोव्हेंबर या दिवशी नेहमीप्रमाणे घरी आले होते. मात्र, त्यांना लगेचच पुन्हा मंत्रालयाकडे बोलवण्यात आले. मंत्रालयाकडे जाताना सीएसटीजवळ त्यांच्यावर दहशतवाद्यांनी फड यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात त्यांच्या हाताचे बोट तुटले आणि कमरेला गोळी लागली. या थरारातून फड वाचले मात्र, इतर अनेकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर मारुती फड हे प्रत्यक्षदर्शी असल्याने त्यांची साक्ष महत्वाची ठरली. त्यांच्या साक्षीमुळे दहशतवादी अजमल कसाब याला फाशीची शिक्षा होण्यास मदत झाली.
हेही वाचा - उघड्या गटारात पडून ४ वर्षीय बालकाचा मृत्यू ; विरारच्या अर्नाळा बंदरपाडा येथील घटना
मंगळवारी 26/ 11 च्या घटनेला अकरा वर्ष पुर्ण झाली. या निमित्त संपुर्ण देशभरात या हल्ल्यात शहिद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आणि नागरिकांना आदरांजली वाहिली जात आहे.