लातूर - कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर मृतदेहाची अदलाबदल झाल्याची धक्कादायक बाब लातूरच्या शासकीय रुग्णालयात घडली आहे. लातूरच्या आबासाहेब चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना लातूरच्या शासकीय सुपरस्पेशालिटी रुग्णालयात 30 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 6 मेच्या पहाटे त्यांचा मृत्यू झाला. याच शासकीय रुग्णालयात चाकुर तालूक्यातील शेळगाव येथील धोंडीबा तोंडारे यांचाही कोरोनाने मृत्यू झाला. परंतू लातूरच्या शासकीय रुग्णालयाच्या गलथान कारभारामुळे मृत आबासाहेब चव्हाण यांचा मृतदेह चाकूरच्या मृत धोंडीबा चव्हाण यांच्या नातेवाईकांना अंत्यविधीसाठी सुपुर्द करण्यात आला.
चाकूर तालूक्यातील शेळगाव येथे त्यांचा विधीवत अंत्यविधीही पार पडला. परंतू मृत्यूच्या तब्बल 19 तासानंतरही आबासाहेब चव्हाण यांच्या नातेवाईकांना अंत्यविधीसाठी त्यांचा मृतदेह लातूर शासकीय रुग्णालय प्रशासनाकडून प्राप्त झाला नाही. सखोल चौकशीअंती लातूरच्या शासकीय रुग्णालयाचा गलथानपणा चव्हाट्यावर आला आहे.
जिल्हात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. परंतू कोरोनाने होणाऱ्या मृत्यूची संख्याही लक्षणीय आहे. त्यातच शासकीय रुग्णालय प्रशासनाचा गलथानपणा चव्हाट्यावर आल्याने संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी रुग्णालय प्रशासन आता दोषींवर काय कारवाई करते. हे पाहणे तितकेच महत्वाचे आहे.