लातूर : लातूर जिल्ह्यातील मौजे हासोरी या गावात मंगळवारी रात्री 10:12 मिनिटाला भूकंपासारखा आवाज येऊ लागला. त्यामुळे भूकंपाच्या भितीने गावातील नागरिक रात्री घराबाहेर येऊन थांबले. अचानक जमीन हादरण्याचा आवाज आल्याने भूकंपाच्या भीतीने अनेकांनी घरं सोडली. गावात सगळीकडे धावपळ सुरू होती. एकाबाजूला बाहेर पाऊस तर दुसरीकडे जमीन हादरवणारा आवाज येत होता. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले होती. ( Earthquake shocks in nilanga taluka )
भूकंपासारखा धक्का जाणवला : प्राप्त माहिती अशी की, लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्याच्या मौजे हासोरी सह परिसरातील गावात मागील चार-पाच दिवसांपुर्वी भूकंपासारखा धक्का जाणवल्याची माहिती गावकऱ्यांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनाला दिली. यावेळी लातूर येथील भूगर्भ शास्त्रज्ञांनी भेट देऊन लोकांशी चर्चा करुन हा भूकंप नाही व त्याची कोणतीही नोंद झाली नसल्याचे सांगितले. नागरिकांनी घाबरु नये असे आवाहन प्रशासनाने केले.
भयभीत ग्रामस्त रस्त्यावर : पण पुन्हा काही दिवसांनी असाच आवाज येऊ लागला. रात्रीच्या वेळी भूकंप झाल्याचे लोकांना जाणवल्याने एकच गोंधळ उडाला. लोक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर येऊन आरडाओरड सुरू झाली. संपूर्ण गाव रस्त्यावर आले ( Scared villager on the street ). लोक भीतीपोटी घरी झोपायला तयार नाहीत, तर दुसरीकडे पाऊस सुरू आहे. त्यामुळे बाहेरही झोपू शकत नाही, अशा अवस्थेत हासोरी गाव आहे.