लातूर - जिल्ह्यात २०१४ च्या विधानसभा निवडणुकांनंतर काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला भाजपने भगदाड पाडले होते. जिल्हा भाजपमय होत असतानाच वाढत चाललेले अंतर्गत मतभेद आणि निवडणुकीच्या तोंडावर जागावाटपात चुकलेले निर्णय यामुळे जिल्हयात भाजपचे मोठे नुकसान झाले आहे. तर या निवडणुकीत महाघाडीला मोठे यश मिळाले आहे. ६ मतदारसंघात २ भाजपला, २ काँग्रेसला तर २ जागा या राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आहेत.
हेही वाचा - सत्तेत बसण्यापेक्षा विरोधी पक्षात बसावे, जयंत पाटलांचा भाजपला टोला
लातूर शहर मतदारसंघ
हा मतदारसंघ काँग्रेसच्या बालेकिल्ला राहिला आहे. काँग्रेस उमेदवार अमित देशमुख यांच्यासमोर भाजप बरोबरच वंचितचेही मोठे आव्हान होते. भाजपकडून गतवेळेचे प्रतिस्पर्धी शैलेश लाहोटीच समोर होते. तर वंचितकडून राष्ट्रवादीतून गेलेले राजा मणियार यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे पोषक वातावरण आणि राजा मणियार यांना दिलेली उमेदवारी ही अमित देशमुखांसाठी मोठी अडचण ठरणार असे चित्र होते. मात्र, लातूर शहरातील मुस्लिम बांधवांनी अमित देशमुख यांनाच पसंती दिली. शिवाय शहर मतदारसंघात असलेल्या आजूबाजूच्या गावच्या नागरिकांनीही अमित देशमुख यांनाच मताधिक्य दिल्याने त्यांनी तब्ब्ल ४२ हजार मतांनी विजय मिळवला आहे.
हेही वाचा - महाडेश्वरांची आमदारकी हुकली, महिनाभरात महापौरपदही जाणार
लातूर ग्रामीण मतदारसंघ
लातूर शहर पाठोपाठ लातूर ग्रामीण काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ मानला जातो. मतदारसंघाच्या स्थापनेपासून या ठिकाणी काँग्रेसचे वर्चस्व आहे. युतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ भाजपाकडे होता. मात्र, ऐन वेळी हा मतरदारसंघ शिवसेनेला देण्यात आला. मात्र, याठिकाणी तगडा उमेदवार नसल्याने तगडा विरोधक नसल्याने येथील निकाल अपेक्षित होता. या मतदारसंघात पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढविणारे धीरज देशमुख हे १ लाख २० हजार मतांनी निवडून आले. तर दुसऱ्या क्रमांकावर नोटाला मतदारांनी पसंती दिली आहे. भाजपमधून इच्छुक असलेले रमेश कराड यांना ऐन वेळी तिकीट डावल्याने त्यांनी युतीच्या उमेदवाराच्या प्रचारापेक्षा नोटाला मतदान करून रोष व्यक्त करण्याचे आव्हान केले होते. त्यामुळे नोटाला तब्बल २७ हजार ५०० मते पडली आहेत. या राजकीय खेळीमुळे लातूर शहर आणि लातूर ग्रामीण या मतदारसंघाचे नेतृत्व अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांच्याकडे राहिले आहे.
हेही वाचा - 'या' मतदारसंघांमध्ये बंडखोर ठरले किंगमेकर
औसा मतदारसंघ
औसा मतदारसंघात उमेदवारी घोषीत झाल्यापासून राजकीय नाट्याला सुरवात झाली होती. भाजपकडून मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. यामुळे कुठेतरी आपणाला धोका निर्माण होईल म्हणून पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील यांनीच त्यांना विरोध करण्यास सुरवात केली होती. एवढेच नाही, तर भाजपचे उमेदवार अभिमन्यू पवार यांच्याविरोधात भाजपमधून बंडखोरी करून बजरंग जाधव यांना उमेदवारी देण्यात आली होती. यामुळे कुठेतरी अभिमन्यू पवार यांच्या मतावर परिणाम होणार काय? अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, तगडी प्रचारयंत्रणा आणि औसा तालुक्यात केलेली कामे या जोरावर अभिमन्यू पवार यांनी अंतर्गत विरोध तर धुडकावून लावलाच शिवाय गेल्या दोन टर्मपासून प्रतिनिधित्व करीत असलेले बसवराज पाटील यांनाही धोबीपछाड दिली. अभिमन्यू पवार हे मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक आहेत. त्यामुळे भविष्यात काय होणार हे महत्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा - 'भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे...'; वरळीत झळकले पोस्टर्स
निलंगा मतदारसंघ
निलंगा मतदारसंघात यावेळीही काका पुतण्यांमध्ये लढाई होती. यामध्ये पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी काका अशोक पाटील निलंगेकर यांचा ३२ हजार मतांनी पराभव केला. अपेक्षेप्रमाणे संभाजी पाटलांना मताधिक्य मिळाले नसून वंचितचे उमेदवार अरविंद भातांब्रे यांनी घेतलेल्या मतांचा फटका त्यांना बसला आहे. मात्र, पालकमंत्री आणि गेल्या ५ वर्षात मतदारसंघात झालेली कामे आणि कार्यकर्त्यांची फळी यामुळे त्यांना हा विजय सुलभ झाला.
हेही वाचा - कॉंग्रेसची शिवसेनेसोबत जाण्याची तयारी; नवी समीकरणे बनणार?
अहमदपूर मतदारसंघ
जिल्ह्यात भाजपमध्ये सर्वाधिक बंडखोरी या मतदार संघात झाली होती. या ठिकाणी राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील हे विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीची जिल्ह्यात एकही जागा नसताना भाजपमधील जागावाटपातील मतभेद हे राष्ट्रवादीच्या पथ्थ्यावर पडले आहेत. शिवाय दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जाहीर सभा झाल्या होत्या. मात्र, युतीकडून केवळ योगी आदित्यराथ यांची एकच सभा झाली होती. त्यामुळे मतदारांना ग्राह्य धरणे आणि अंतर्गत गटबाजी यामुळे बाबासाहेब पाटील पुन्हा आमदारपदी विराजमान झाले आहेत.
हेही वाचा - राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं; छगन भुजबळांचे सूचक वक्तव्य
उदगीर मतदारसंघ
अहमदपूर मतदारसंघाप्रमाणे उदगीरमध्येही भाजपमध्ये अंतर्गत मतभेद मोठ्या प्रमाणात झाले होते. यामुळेच विद्यमान आमदार सुधाकर भालेराव यांचे तिकीट कापून डॉ. अनिल कांबळे यांनी हि निवडणूक लढवली. बंडखोरी करीत सुधाकर भालेराव यांनी उमेदवारी दाखलही केली. मात्र, ऐन वेळी माघार घेतली. असे असूनही त्यांनी डॉ. अनिल कांबळे याना मदत केली कि नाही हा संशोधनाचा विषय ठरला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे संजय बनसोडे यांनी प्रत्यक्ष मतदारांमध्ये जाऊन केलेला प्रचार आणि शरद पवार यांची सभा त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरली. त्यामुळेच एक कार्यकर्ता ते आमदार असा त्यांचा प्रवास यशस्वी ठरला आहे.