लातूर - पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना सुरू होऊन वर्षभराचा कालावधी लोटला तरी तालुक्यातील गातेगावच्या ८० ते १०० शेतकऱ्यांना प्रत्यक्षात या योजनेचा लाभ मिळालेला नाही. स्थनिक पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रे दाखल केली होती. मात्र, तलाठ्याकडून नाव नोंदणी करण्यात झालेली चूक शेतकऱ्यांना भोगावी लागत आहे.
वर्षभरापूर्वी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा करण्याचा निर्णय झाला आणि प्रत्यक्षात उतरालाही. मात्र, लातूर तालुक्यातील ८० शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप या योजनेअंतर्गत एक रुपयाही जमा झालेला नाही. असे असतानाही महसूलच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत टाळाटाळ केली जात होती.
हेही वाचा - ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगराई, बळीराजा चिंतेत
दरम्यान, वर्षभरानंतर शेतकऱ्यांची नावे आणि खाते क्रमांक चुकीचा भरला गेल्याने या योजनेची रक्कम इतरत्रच जमा होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे झालेली चुक दुरूस्त करून हक्काची सर्व रक्कम खात्यावर जमा करण्याची मागणी आता शेतकरी करत आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर न जमा झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे महादेव चौंडे यांनी सांगितले आहे.