लातूर - भर पावसाळ्यात लातूरकरांना उन्हाळ्याची अनुभुती येत आहे. शहराला महिन्यातून किमान दोनदा पाणीपुरवठा होतो. मात्र, ग्रामीण भागात आजही मोजून-मापून पाणी दिले जात आहे. ही अवस्था आहे मांजरा नदीकाठी असलेल्या भातखेडा गावची. ग्रामपंचायतीकडून घेतलेल्या बोअरवरून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, एका कुटुंबाला 5 घागर पाणी एवढाच. त्यामुळे भर पावसाळ्यात पाणीटंचाईच्या झळा कायम आहेत.
पावसाळा सुरू होऊन तीन महिने उलटले तरी जिल्ह्यातील नदी, नाले, ओढे हे कोरडेठाक आहेत. सर्वच्या सर्व प्रकल्प हे कोरडेठाक असून पाण्यासाठीची भटकंती कायम आहे. दिवस उजडताच या गावच्या महिला पाण्यासाठी अधिग्रहण केलेल्या नळाभवती जमतात. अनेकवेळा पाण्यासाठी भांडणेही होतात. मात्र, रोजगार आणि घरकाम सोडून केवळ 5 घागरी पाणी मिळते.
भर पावसाळ्यात 107 टँकरने पाणीपुरवठा
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह बळीराजाला सहन करावा लागत आहे. लातूर शहराला लागूनच मांजरा नदीचे पात्र आहे. मात्र, या नदीपात्रातील खड्ड्यांमध्ये पाणी साठलेले नाही. जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत केवळ 38 टक्के पाऊस झालेला आहे. त्यामुळे भर पावसाळ्यात 107 टँकरने पाणीपुरवठा सुरू असून एक हजाराहून अधिक जलस्त्रोतांचे अधिग्रहण करण्याची नामुष्की जिल्हा प्रशासनावर ओढवलेली आहे.
हेही वाचा - मनुस्मृतीला पोसणाऱ्या व संविधानाला विरोध करणाऱ्या भाजपला हद्दपार करा - जिग्नेश मेवाणी
8 महिन्यांपासून पाणी टंचाई
यंदाच्या पावसाळ्यात ना पाणीपातळी वाढली आहे ना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. गेल्या 8 महिन्यांपासून लातूरकर पाणीटंचाईला सामोरे जात आहेत. दरवर्षी हंगामाच्या शेवटी परतीच्या मान्सूनने दिलासा दिलेला आहे. यंदाही किमान परतीच्या पावसाने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा, अशी अपेक्षा लातूरकर व्यक्त करीत आहेत.
हेही वाचा - रोहित्रावर चढून दुरुस्तीचे काम करणाऱ्या शेतकऱ्याचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू
लोकप्रतिनिधी आगामी निवडणुकीत व्यस्त
आजही ग्रामीण भागात नळासमोर घागरीच्या रांगा आणि टँकर गावात येताच ग्रामस्थांची तारांबळ कायम आहे. लोकप्रतिनिधी आगामी निवडणुकीत व्यस्त असले तरी सर्वसामान्य जनतेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.