लातूर- पावसाळा निम्म्यावर येऊन ठेपला तरी दुष्काळ लातूरकरांची पाठ सोडायला तयार नाही. सद्यस्थितील जिल्ह्यात 113 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर 1242 जलस्त्रोतांचे अधिग्रहण हे सुरूच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या तर खोळंबल्या आहेत. शिवाय पिण्याच्या पाण्याचा आणि जनावराच्या चाऱ्याचा प्रश्नही कायम आहे.
लातूर शहर वगळता इतर सर्व ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. शहराला मांजरा धरणातून पाणीपुरवठा केला जात असून हे धरणही मृतसाठ्यात आहे. त्यामुळे जुलै अखेरपर्यंतच या धरणातील पाणी पुरेल असा अंदाज वर्तीवला जात होता. मात्र, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे अजून काही दिवस या धरणातून पाणीपुरवठा होईल असा अंदाज मनपाने व्यक्त केला आहे.
दुसरीकडे पावसाने अद्यापपर्यंत 100 मिमीची सारसरीही ओलांडली नसल्याने पेरण्याचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे कोकणात पडणारा पाऊस मराठवाड्यावर केव्हा कृपादृष्टी दाखविणार, याची चिंता बळीराजाला लागली आहे. जिल्ह्यात पावसाची सरासरी 802 मिमी असून आतापर्यंत 90 मिमी पाऊस झाला आहे. तर खरीपाचे क्षेत्र 6 लाख 2 हजाराहून अधिक असतानाही सरासरीच्या केवळ 5 टक्के क्षेत्रावर पेरा झाला आहे.