लातूर - पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी पाणी टंचाईबाबत काल आढावा बैठक घेतली. सध्याची दाहकता कमी होऊनही जून महिन्यात पाऊस झाला नाही, तर काय उपाययोजना करायच्या यावर अधिक मंथन झाले. त्यामुळे पाणीटंचाईवर तत्काळ उपायोजना करण्यावर चर्चा न होता, जलसंधारणाची कामे किती परिणामकारक आहेत. त्यामुळेच टँकरची संख्या जिल्ह्यात कमी झाल्याचे पटवून देण्यात जिल्हा प्रशासनासह पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर व्यग्र असल्याचे दिसून आले.
पालकमंत्र्यांनी दुष्काळाचा आढावा घेऊन योग्य त्या उपाययोजनेबाबत निर्णय घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानंतर शुक्रवारी पालकमंत्री संभाजी पाटील यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्ह्याची स्थिती जाणून घेतली. सध्या ४५ टँकरने पाणीपुरवठा होत असून ५५० विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. शिवाय मागणी असेल त्या ठिकाणी २४ तासाच्या आत टँकर सुरू करण्याचेही पालकमंत्र्यांनी आश्वासन दिले.
प्रत्यक्षात महिन्याभरापासूनचे टँकरचे प्रस्ताव प्रक्रियेत रखडले आहेत. अधिग्रहणासाठी जलसाठेच शिल्लक नाहीत. अशी स्थिती असताना जिल्हा प्रशासन दुष्काळ निवारण्यात सक्षम असल्याचे सांगितले जात आहे. पाण्यासाठी आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांची भटकंती होत आहे मात्र, सर्व काही सुरळीत असून भविष्यातही ४० टक्केच पाऊस झाला, तर काय उपाययोजना करायची याचे नियोजन जिल्हा प्रशासन करीत असल्याचे पालकमंत्री सांगत आहेत. त्यामुळे सध्याच्या स्थितीकडे कानाडोळा केला जातो की काय, असा सवाल उपस्थित होत आहे.