लातूर - पती-पत्नीच्या वादातून दुहेरी हत्याकांड झाल्याची धक्कादायक घटना शहरातील भांबरी चौक परिसरात घडली आहे. भीमा चव्हाण आणि ललिता चव्हाण असे या पती-पत्नीचे नाव असून ते मूळचे वरवंटी येथील रहिवासी आहे. विशेष म्हणजे या घटनेत पती-पत्नी दोघेही बचावले असून इतरत्र तरुणांचाच बळी गेला आहे.
मूळचे वरवंटी येथील हे दाम्पत्य सध्या लातुरातील भांबरी चौकात राहतात. भीमा हा मजुरी करीत करतो तर पत्नी ललिता ही चहा-नाश्त्याचे हॉटेल चालवते. या दोघांमध्ये अनेक दिवसांपासून प्रचंड वाद सुरू होते. यासंबंधी भीमा चव्हाण याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
तर, बहिणीच्या विरोधात तक्रार का दिली म्हणून ललिताचा भाऊ बालाजी राठोड हा आपल्या मित्रांना घेऊन भीमा चव्हाणच्या घराकडे निघाला. ही बाब समजताच भीमाने देखील पुतण्या आनंद चव्हाण (20) आणि भाचा अरुण राठोड (18) या दोघांना बोलावून घेतले.
दरम्यान, भीमा चव्हाणच्या भांबरी चौकातील घरासमोर भांडणे झाली. या भांडण व मारहाणीत बालाजी राठोड याच्या मित्राने आनंद आणि अरुण यांच्यावर धारदार शास्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात आनंद आणि अरुण जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुख्य आरोपीला अटकेत घेतले. सध्या दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आली आहेत. तर ललिता आणि तिच्या भावाच्या शोधात पथके रवाना झाली आहेत.