लातूर - संचारबंदी काळात अनेकांना रिकाम्या वेळात घरी काय करावे असा प्रश्न पडला आहे. मात्र, लातुरातील एका डॉक्टरच्या सगळ्या कुटुंबाने विधायक कार्यात झोकून दिले आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत आरोग्य व पोलीस यंत्रणेतील अधिकारी- कर्मचारी यांच्याकरिता त्यांनी फेस शिल्ड बनवण्याचे काम हाती घेतले आहे. मागेल त्याला हे सुरक्षा कवच दिले जात आहे.
कोरोना विरुद्धच्या लढाईत जो-तो आपल्या परीने मदत, समाजकार्य करण्याचा प्रयत्न करीत आहे. आपले सहकारीच परस्थितीशी दोन हात करून आरोग्यसेवा करत आहेत. त्यांच्याकरिता एक विधायक कार्य करण्याच्या हेतूने दंत चिकित्सक सतीश बिराजदार यांनी 3 हजार फेस शिल्ड बनवण्याचा निर्धार केला होता. त्यांच्या या सामाजिक कार्यात घरातील सर्व सदस्यांनी मदत केली असून मागणीनुसार सध्या या सुरक्षा कवचचा पुरवठा सुरू आहे.
जिल्हा आरोग्य विभागातील आपले सहकारी रात्र- दिवस जनतेच्या सेवेत आहेत. शिवाय पोलीस अधिकारी-कर्मचारीही 24 तास रस्त्यावर थांबून घरी बसण्याचे आवाहन करत आहेत. त्यांची सेवा करणे हे कर्तव्य समजून डॉ. बिराजदार यांनी हा उपक्रम हाती घेतला. यामध्ये डॉक्टर असलेला मुलगा अभिषेक बिराजदार याच्यासह घरातील सर्वजण परिश्रम घेत आहेत. येथील विलासराव देशमुख वैद्यकीय शासकीय महाविद्यालयातील अधिकारी, खासगी दवाखान्यातील कर्मचारी आणि पोलिसांना हे फेस शिल्ड तयार करून दिले जात आहेत. अनेक सामाजिक संघटना यांनी मास्क तयार करणे, गरजूंना अन्नधान्याचे वाटप करणे यासारखी कामे केली आहेत.