लातूर - पश्चिम महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. तर, मराठवाड्याकडे पावसाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे शेती पिकाचे नुकसान झाले आहे. मात्र, यासाठीही प्रशासनाची आडमुठी भूमिकाच जबाबदार असल्याचे सांगत मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
खरीप हंगामांच्या सुरुवातीपासून जिल्ह्यातील शेतकरी निसर्गाच्या लहरीपणाला सामोरे जात आहे. खरीपाची पेरणी झाली आहे. मात्र, त्यांनतर पावसाने दडी मारल्याने खरीप हातचा गेला. हवामान खात्याने वर्तविलेले सर्व अंदाज फोल ठरले आहेत. हवामान खात्यावर विश्वास ठेऊन शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊसच झाला नाही. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तर झालेच आहे. याशिवाय उत्पादनही शेतकऱ्यांच्या पदरी पडलेले नाही. या सर्व नुकसानीस हवामान खाते जबाबदार आहे, असा आरोप करत भिसे वाघोली येथील सत्तार पटेल आणि शेतकऱ्यांनी हवामान खात्याने फसवणूक केल्याची तक्रार मुरुड येथील पोलीस दिली होती. त्यांनंतरही कारवाई झाली नसल्याने मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनावरांचा स्वाभिमानी बाजार भरविणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.