लातूर - वर्धापन दिनानिमित्त लातूरच्या दिशा प्रतिष्ठानने एक महत्वकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. ग्रामीण भागातील जनतेसाठी त्यांनी फिरता दवाखाना सुरू केला आहे. या दवाखान्यामुळे ग्रामीण जनतेला वैद्यकीय सेवा तातडीने मिळण्यास मदत होणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिष्ठानचे कौतुक
गेल्या वर्ष भरापासून सामाजिक क्षेत्रात दिशा प्रतिष्ठानचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. 21 मार्चला आज या प्रतिष्ठानला एक वर्ष पूर्ण झाले. संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त फिरता दवाखाना सुरू करण्यात आला आहे. या दवाखान्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या हस्ते करण्यात आले आहे. लातूर तालुक्यासह इतर ठिकाणी आठवडी बाजाराच्या दिवशी हा दवाखाना संबंधित गावात जाणार आहे. त्यामुळे सभोतालच्या गावातील ग्रामस्थांनाही याचा लाभ घेता येणार आहे. या दवाखान्यात प्राथमिक उपचार करता येणार असून, उपचाराच्या सर्व सोयी या दवाखान्यात आहेत. या अनोख्या उपक्रमाबद्दल जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी प्रतिष्ठानचे कौतुक केले आहे.