लातूर - लिंगायत समाजाचे धर्मगुरू तसेच राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे वयाच्या १०४ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. गत आठवड्यात त्यांनी अन्नत्यागही केला होता. नांदेड येथील नारायणा सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव शासकीय रुग्णवाहिकेने अहमदपूर येथील भक्तीस्थळाकडे रवाना झाले आहे.
डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज हे लिंगायत समाजाचे श्रद्धेचे स्थान होते. समाजाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य घालवले होते. २५ फेब्रुवारी १९२७ साली त्यांचा जन्म झाला होता. शिवाय त्यांनी लाहोर विद्यापीठातून वैद्यकीय अभ्यासक्रमाची पदवीही मिळवली होती आणि जिल्ह्यातील पहिले डॉक्टर म्हणून त्यांची ओळख होती. १९३२ साली विरमठ संस्थानाचे ते उत्तराधिकारी झाले होते. त्यांनी पहिल्यांदा श्रावण मास अनुष्ठान कपिलधार येथे केले होते. तर, गतआठवड्यात त्यांनी तपअनुष्ठान केले होते. त्यामुळे, त्यांची तब्येतही खालावली होती. याच दरम्यान, ते जिवंत समाधी घेणार असल्याची अफवा पसरली होती. त्यामुळे, अहमदपूर येथील भक्तीस्थळावर भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दीही केली होती.
ही अफवा असल्याचे सांगताच गर्दी पांगली व डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना उपचारासाठी दोन दिवसांपूर्वी नांदेड येथील नारायणा सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मंगळवारी दुपारी १ च्या दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, गेल्या आठवड्यातच अहमदपूर मठाचे उत्तराधिकारी म्हणून त्यांचे नातू राजशेखर स्वामी यांची त्यांनी घोषणा केली होती. तर, हडोळती येथील मठाचे उत्तराधिकारी हे त्यांचे पुतणे राजकुमार स्वामी हे आहेत.
शेवटच्या टप्प्यात उत्तराधिकारी आणि ट्रस्टचे अध्यक्ष कोण होणार यावरून मतभेद झाले होते. मात्र, रविवारी डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी या वादावर पडदा टाकला होता. शिवाय, सध्याचे ट्रस्ट यावर माझा विश्वास असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यामुळे, मठाचे आणि उत्तराधिकारी यांच्यातील मतभेद दूर करून अखेर डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच अहमदपूर येथील भक्तीस्थळाकडे भक्तांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती.
हेही वाचा- भूकंप पुनर्वसनात मिळालेल्या घरावर महिलेचा कब्जा, बेघर झालेल्या कुटुंबावर आली 'ही' वेळ...