लातूर - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आता जिल्हा प्रशासनही योग्य ती खबरदारी घेत आहे. शहरी भागात रात्रीची संचारबंदी यापूर्वीच करण्यात आली आहे. आता लातूर ग्रामीण भागातही रात्रीची संचारबंदी करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्यावतीने नियमावली जारी करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या 500 पेक्षा अधिक वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी लातूर जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपालिका व त्यालगत ३ किलो मीटर हद्दीत लावण्यात आहे. हे निर्बंध आता जिल्ह्यातील 45 मोठ्या ग्रामपंचायत असलेल्या गावांमध्येही 15 एप्रिलपर्यंत लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानूसार मोठ्या ग्रामपंचायतींमध्येही रात्रीची संचारबंदीसह इतर निर्बंध आजपासून (गुरुवार) लागू होणार आहेत. कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असून त्याचाच एक भाग म्हणून हे निर्बंध लावण्यात आले आहे. हे निर्बंध लातूर जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतींना लागू करण्याची बाब जिल्हाप्राधिकरणाच्या विचाराधीन होती. त्यानूसार गुरुवारपासून अंमलबजावणीला सुरवात झाली आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीतील पान टपऱ्या, चहा टपऱ्या, हॉटेल बंद राहातील. पार्सल व्यवस्था मात्र सुरु राहणार आहे.
हेही वाचा-लॉकडाऊन लावू नका, काँग्रेस नेते संजय निरुपमांचे हॉटेल व्यावसायिकांसह आंदोलन