लातूर - मांजरा नदीचा प्रवाह बदलत असल्याने हालशी तुगाव येथील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. नदीपात्राचा काठ आर्धा किलोमीटर वाहून गेल्याने १९ शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले असून पिकांचे नुकसान झाले आहे.
निलंगा तालुक्यात चार दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे, मांजरा नदीत पाण्याचा प्रवाह वाढला. तसेच, नदीने प्रवाह बदलल्याने तिचे पाणी हालशी तुगाव येथील नदी काठच्या शेतांमध्ये शिरले. यात शेतकरी नागम्मा धनराज नेकनाळे, विजयकुमार नेकनाळे, राजकुमार नेकनाळे, शंकर नेकनाळे, मलिकर्जुन नेकनाळे, तानाजी पाटील, दत्ता पाटील, शेषराव पाटील, गोपाळ पाटील या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
नदीचे पाणी शेतात शिरल्याने शेतजमिनी खचून गेल्या आहेत. संपूर्ण पीक वाहून गेले आहे. जवळपास एक किलोमीटर परिसराला नुकसान झाले आहे. सरकारने भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
हेही वाचा- लातुरात केंद्र सरकारच्या निर्यातबंदीच्या निर्णयाची होळी अन् कांद्याची रांगोळी