लातूर - नोकरीचे आमिष दाखवून कोण काय करेल याचा नियम नाही. लातुरात चक्क समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्याने एका संस्थेतील अनुकंपाच्या तत्वावर नोकरी देण्याचे आमिष दाखवत महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. यासंदर्भात महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली असून संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा
येथील समाज कल्याण अधिकारी नागेश खमितकर यांनी एका संस्थेतील अनुकंपा तत्वावर नोकरीसाठीचे नियुक्तीपत्र देण्यासाठी एका तरुणीस चक्क शरीरसुखाची मागणी केली आहे. यामुळे संतप्त झालेल्या तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
तरुणीने केली तक्रार
पीडित तरुणीचे वडील लातूर येथील एका संस्थेत नोकरी करत होते. त्याचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. यामुळे सदरील तरुणी ही वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर या ठिकाणी नोकरी मागत होती. आवश्यक ती कागदपत्रेही तिने दाखल केली आहेत. याबाबत लवकरच तुझे नियुक्तीपत्र काढतो. मात्र त्याबदल्यात शरीरसुखाची मागणी पूर्ण करावी लागेल, असा प्रस्ताव नागेश खमितकर यांनी तरुणीसमोर ठेवला. यामुळे त्या तरुणीने तत्काळ याची तक्रार लातूरचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पालकमंत्री यांच्याकडे केली.
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलिसांनी तपास केल्यावर याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. आता जिल्हा परिषद प्रशासनाने खमीतकर यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.