लातूर - दुष्काळाशी शेतकरी दोन हात करीत असताना त्यांना विद्युत विभागाच्या नियोजन शून्य कारभाराचाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. औसा तालुक्यातील लामजना येथील महावितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे शॉर्टसर्किट होऊन शेती साहित्य जळून खाक झाले असून जनावरेही दगावली आहेत.
वाऱ्यामुळे लमजना परिसरातील अनेक गावामध्ये विद्युत तारा खाली लोंबल्या आहे. त्यामुळे नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार आज औसा तालुक्यातील रामेगाव येथील विठ्ठल जाधव यांच्या शेतात घडला. शॉर्टसर्किटमुळे त्यांच्या गोठ्याला आग लागली. या आगीत त्यांच्या शेतातील जनावारचा कडबा व इतर सर्व वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या आगीत अंदाजे २ लाख ५० हजारांचे नुकसान झाले असून त्यांच्या शेतात असलेल्या एका बैलाचा सुध्दा या आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या बैलावर उपचार सुरू आहे. या शॉर्टसर्किटमुळे शेतकऱयाचे मोठे नुकसान झाले असून त्यानी नुकसानभरपाईची मागणी केली आहे.