लातूर - संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेरलेल्या कोरोना या महामारीने सध्या ग्रामीण भागातही पाय पसरायला सुरुवात केली आहे. निलंगा तालुक्यातील शिरोळ वांजरवाडा येथील पती-पत्नी दिल्लीतील मरकझच्या कार्यक्रमाला हजर होते. त्यांच्यासोबत अन्य काहीजण देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. मात्र, त्यांची कोणत्याही प्रकारची वैद्यकीय चाचणी झालेली नाही. तसेच संबंधित व्यक्ती अद्याप मोकाट वावरत आहेत.
परिचारिका अरूणा राठोड यांना संबंधित माहिती मिळाली. यानंत त्यांनी तत्काळ या व्यक्तींच्या घरी जाऊन त्यांची चौकशी केली. यावेळी त्यांना पती-तत्नीच्या सांगण्यात तफावत आढळून आली. संबंधित कुटुंबीय दिल्लीतील मरकझच्या कार्यक्रमात उपस्थित होते. यानंतर ते दोघेही २५ मार्चला शिरोळ या त्यांच्या गावी परतल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यामुळे आज संध्याकाळी सात वाजता संपूर्ण कुटुंबीयांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले.
तसेच निलंगा आणि उदगीर तालुक्यातील पाच जोडपी या कार्यक्रमासाठी दिल्लीत गेल्याची माहिती मिळत आहे.