लातूर - सर्वकाही कोरोना अशीच परिस्थिती सध्या सर्वत्र पाहावयास मिळत आहे. याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शहरातील चौकाचौकात पोलीस आणि ग्रामीण भागात आरोग्य विभागाचे अधिकारी अशी अवस्था आहे. केवळ पोलीस यंत्रणाच नाही तर ग्रामीण भागात पोलीस पाटील आणि ग्रामपंचायतीकडून सर्वतोपरी जनजागृतीचे प्रयत्न केले जात आहेत. अशाच प्रकारचा अहमदपूर तालुक्यातील हाडोळती येथील हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त आणि ग्रामीण भागात या व्हायरल विषाणूबद्दलची भीती यामुळे सर्वत्र स्मशान शांतता आहे. असे असले तरी परजिल्ह्यातील नागरिक लातुरात येऊ नये आणि नियमांचा भंग होऊ नये यासाठी पोलीस रात्र- रात्र जागून काढत आहेत. तर गावागावात सकाळ-संध्याकाळी ग्रामस्थांनी कशी काळजी घ्यावयाची याबाबत जनजागृती केली जातेय. हाडोळती येथे कोतवाल सकाळी आणि संध्याकाळी दवंडी देऊन कोरोना होण्याची कारणे आणि घ्यावयाची काळजी याबाबत दवंडी देत आहे.
सध्या लातूर जिल्ह्यात एकही कोरोनग्रस्त रुग्ण नाही. मात्र, 32 संशयतांची तपासणी करण्यात आली असून सर्वांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. ग्रामीण भागातील नागरिक कमालीचे सतर्क झाले आहेत. गावात येणाऱ्यांना तपासणी करून येण्याचा सल्ला दिला जात आहे तर स्वछतेचे महत्वही पटवून दिले जात आहे. एकंदरीत कोरोनाबद्दलची भीती निर्माण झाल्याने शहरांपेक्षा ग्रामीण भागात अधिकचा शुकशुकाट पीहावयास मिळत आहे.