लातूर - देशाचा सर्वात मोठा विमा मोदीजी असून ते सर्वात मोठे सुरक्षा कवच आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ते लातूर येथे महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारेंच्या प्रचारसभेत बोलत होते.
चुकीने राहिलेला विमा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल. ही निवडणूक देशाचा मान-सन्मान ठरवण्याची निवडणूक आहे. राहुल गांधींनी काँग्रेस सत्तेत आल्यानंतर गरिबांना अर्थसहाय्य देऊ, असे सांगितले आहे. त्यांनी ही घोषणा काय खाऊन केली ते सांगावे. तुमचे पणजोबा, आजी, वडील, आईनेही गरीबी हटवण्याची घोषणा केली होती. मात्र, अजूनपर्यंत ती हटली नाही, अशी टीका त्यांनी काँग्रेसवर केली.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे -
मोदी सरकारच्या काळात जातीभेद केला गेला नाही. बंजारा समाजासाठी नवीन महामंडळाची स्थापना करुन यातून १२ योजना सुरू केल्या. त्याचा लाभ अनेकांना मिळत आहे. गरिबांना उभे करण्याचे काम गेल्या ५ वर्षात मोठ्या प्रमाणात सुरू झाले असून लवकरच २ वर्षांत सर्वांना हक्काचे घर मिळेल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. ते म्हणाले, देशात ६० वर्ष भ्रष्टाचारी सरकार होते. मात्र, मोदी सत्तेवर आल्यापासून विरोधकांना स्वप्नातही मोदी दिसतात. मोदींनी भ्रष्टाचारी आणि दलालांना संपवले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिला काय अन् नाही राहिला काय तसेच शृंगारे खासदार होतील काय अन् नाही होतील काय, पण देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मतदान करा, असे आवाहन त्यांनी उपस्थित जनतेला केले.