लातूर - कोरोनावर मात करण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आले असून सध्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये उद्योग- व्यवसायाला तसेच शेती व्यवसायाशी निगडित बाबींना सूट देण्यात आली आहे. मात्र, शहरात दिवसेंदिवस गर्दी वाढत असून नियमांचे पालन केले जात नसेल तर संबंधित उद्योग- व्यवसाय बंद करण्याच्या सूचना पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हास्तरीय बैठकीत दिल्या आहेत.
4 मे पासून लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. मात्र, पहिल्याच दिवशी वाईन शॉप आणि इतरत्र मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ निर्माण झाली होती. त्यामुळे पालकमंत्री अमित देशमुख यांनी आढावा बैठक घेऊन योग्य त्या सूचना दिल्या आहेत. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने, महापौर विक्रांत गोजमगुंडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्यासह इतर विभागातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
ऑरेंज झोनसाठी मार्गदर्शक सुचना ठरवून दिलेल्या आहेत. त्यानुसारच काटेकोरपणे अंमलबजावणी करून उद्योग- व्यवसायाला परवानगी द्यावी. यामध्ये मास्क वापरणे आणि सोशल डिस्टन्स ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तर उदगीर येथील कंटेन्मेंट झोनमध्ये अत्यावश्यक सुविधा पुरवून सर्वांची आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
लातुर शहरात नागिरकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे उद्योग- व्यावसायिकांनी नियमांचे उल्लंघन केले, तर संबंधित उद्योग- व्यवसाय बंद करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. अशाप्रकारच्या अनेक सूचना पालकमंत्री यांनी दिल्या असल्या तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होणार का, हे महत्वाचे आहे. कारण, नियमात शिथिलता आणून दोन दिवस उलटले आहेत. मात्र, सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढतच आहे. त्यामुळे महानगरपालिका काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरवणार आहे.