लातूर - शहराला 10 दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. एस. ओ. एस. कॉलनीत सार्वजनिक बोअरवरील पाणी सोडण्यावरून मंगळवारी रात्री 10च्या दरम्यान दोन गटात तलवार, कोयत्याने तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये 5 जण जखमी झाले आहेत, तर 9 जणांवर विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शहराच्या बाह्यभागात असलेल्या एस.ओ.एस कॉलनीत सार्वजनिक बोअरवेलवर नागरिकांची मदार आहे. संतोष पाटोळे, अजय पाटोळे यांच्याकडून नियमित वेळी बोअरचे पाणी न सोडता रात्री-अपरात्री पाणी सोडले जात होते. याबाबत अश्रूबा परमेश्वर लोंढे यांनी त्यांना समज दिली होती. यावरून दुपारी बाचाबाचीही झाली होती. मात्र, अश्रूबा यांनी केलेला विरोध मनात ठेवून रात्री आपल्या चारचाकी गाडीतून अश्रूबा हे घराकडे परतत असताना शेखर पाटोळे, अजय पाटोळे यांच्यासह इतर सात जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये अश्रूबा यांच्यासह इतर चौघे जखमी झाले आहेत.
शहराला मांजरा धारणावरून 10 दिवसाला पाणीपुरवठा होत आहे. असे असताना काही भागात तीव्र टंचाई निर्माण होत असल्याने सार्वजनिक बोअरची सोय मनपाने केली आहे. मात्र, त्याचे नियोजन नसल्याने असे प्रकार घडत आहेत.