लातूर - जागतिक योगदिनाचे निमित्त साधत योगगुरू रामदेवबाबा यांच्याबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगाचे धडे घेतले. त्यावेळी मुख्यमंत्री रामदेव बाबा यांच्यावर इतके मेहेरबान झाले की, त्यांनी पतंजलीचा तेल उद्योग थाटण्यासाठी त्यांना लातुरातील तब्बल ४५० एक्कर जमीन देण्याचे आश्वासन दिले. एवढेच नाही तर यानंतर ५ दिवसातच या जमिनीच्या संदर्भातील पत्रही योगगुरू रामदेव बाबा यांना देण्यात आल्याने औसा तालुक्यातील टेंभी येथील भेल (भारत हेव्ही इलेक्ट्रीकल्स लि.) ची ही जमीन देण्याचे पूर्वनियोजित होते की काय? अशी शंका उपस्थित होत आहे.
नांदेड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या योगाची चर्चा संपताच, आता त्यांनी पतंजली उद्योगाच्या अनुषंगाने रामदेव बाबा यांना दिलेल्या ऑफरची चर्चा रंगू लागली आहे. औसा तालुक्यातील टेंभी येथे तब्बल ४५० एकरामध्ये भेल हा प्रकल्प उभारण्यासाठी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी ही जमीन आरक्षित केली होती. मात्र, त्यांच्या निधनानंतर हा प्रकल्प रखडला. रोजगार मिळेल या आशेने येथील शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या होत्या. मात्र, तो प्रश्न आजही 'जैसे थे' आहे.
हा प्रश्न अनुत्तरित असताना ही जमीन पतंजलीच्या उद्योगाला देण्याचा घाट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने घातला. त्यामुळे पतंजली उद्योगाला जमीन दिली तर उद्योग कोण देणार? असा सवाल आता उपस्थित होत आहे. या जमिनीबरोबर येथे उभारल्या जाणाऱ्या उद्योगाला कोणताही कर आकारला जाणार नसल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्याकडून देण्यात आलेल्या पत्रकात करण्यात आला आहे. त्यामुळे भेल अन् पतंजलीच्या तेल उद्योगासाठीचा हा खेळ जागतिक योग दिनापासून सुरू झाला आहे. नाममात्र नोकरीच्या आश्वासनावर या जमिनी घेण्यात आल्या असताना आता पतंजली या खासगी उद्योग समूहाला का देण्यात येत आहे? असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र, दुसरीकडे पतंजलीच्या उद्योग समूहाला केवळ सहमती दर्शवली असून हा विषय केवळ पत्रापुरताच मर्यादित असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे.