लातूर : लॉकडाऊनमधील शिथिलतेनंतर लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू करण्यात आली होती. त्यामुळे गेल्या महिन्याभरात 4 लाख क्विंटल धान्याची आवक झाली होती, तर 117 कोटींची उलाढाल झाली होती. सर्व काही सुरळीत सुरू असतानाच, तीन दिवसांपूर्वी एका अडत्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे खबरदारी म्हणून 3 जूनपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधीत अडत व्यापाऱ्यासह कुटुंबातील 9 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीसह मोती नगर परिसर सील करण्यात आला आहे.
हेही वाचा... शाब्बास..! लॉकडाऊनमध्ये बाप-लेकाने खोदली विहीर, पाणी प्रश्न कायमचा मिटवला
लॉकडाऊनच्या शिथिलतेनंतर सर्वात अगोदर शेती संबंधित उद्योग- व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे महिन्याभरापूर्वी लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू झाली होती. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. खरीप हंगामाच्या तोंडावर खते, बी- बियाणे खरेदी करणे शक्य झाले होते. शिवाय महिन्यात 4 लाख क्विंटलहून अधिक धान्याची आवक झाली होती. तसेच 177 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या पदरी पडले होते.
खरेदी-विक्री होताना ठरवून दिलेल्या नियमांचे शेतकऱ्यांनी पालन केले. मात्र, एका व्यापाऱ्याच्या संपर्कात आलेल्या अडत्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. एवढेच नाही तर सदर बाधिताच्या संपर्कात आलेल्या कटुंबातील 9 सदस्यांना देखील कोरोना झाला आहे. त्यामुळेच बाजार समितीमध्ये याचा अधिक प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी 3 जूनपर्यंत बाजार समिती बंद ठेवण्यात येणार आहे. शिवाय या परिसरात निर्जंतुकिकरण केले जात आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीला लागूनच असलेला परिसर मोती नगर सील करण्यात आला आहे. त्यामुळे काय परिस्थिती निर्माण होईल त्यानुसार बाजार समिती सुरू केली जाणार असल्याचे सभापती ललीतभाई शहा यांनी सांगितले. बाजार समितीत कोरोनाचा शिरकाव झाल्याने दिवसाकाठी होणारे लाखोंचे व्यवहार ठप्प झाले आहेत. बाजरपेठेत कमालीचा शुकशुकाट पाहायला मिळत आहे. या तीन दिवसांच्या कालावधीत बाजार समितीचा परिसर आणि अडत्यांच्या दुकानांचे निर्जंतुकिकरण केले जात आहे.
हेही वाचा... Lockdown - 5 : सरकारची नवी नियमावली जाहीर.. वाचा काय राहणार बंद अन् काय होणार सुरू