लातूर - अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर सोमवारी जिल्ह्यातील दहाही पंचायत समितीमध्ये सभापती, उपसभापतीच्या निवडी पार पडल्या आहेत. निलंगा भाजपकडे कायम असून लातूर पंचायत समिती ही काँग्रेसकडे कायम आहे. उदगीरमध्ये मात्र, भाजपच्या दोन सदस्यांची चिठ्ठी टाकून निवड प्रक्रिया पार पडली.
हेही वाचा- वाद घालणे अन् भिंती रंगवण्याचे काम आम्हाला राहिले नाही; मुख्यमंत्री ठाकरेंचा फडणवीसांना टोला
१५ दिवसांपूर्वी आरक्षण जाहीर झाल्यानंतर सोमवारी पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडी पार पडल्या आहेत. निलंगा आणि लातूर या प्रमुख पंचायत समितीमध्ये अपेक्षेप्रमाणे निवडी झाल्या असून निलंगा पंचायत समितीच्या दोन्ही पदाधिकाऱ्यांची निवड बिनविरोध झाली आहे. सभापतीपदी राधा सुरेश बिरजदार तर उपसभापतीपदी अंजली राजा होंडगे याची वर्णी लागली आहे. लातूर पंचायत समिती सभापती पदी काँग्रेसच्या सरस्वती नामदेव पाटील तर उपसभापतीपदी प्रकाश उफाडे यांची निवड झाली. तर औसा येथे सभापतीपदी अर्चना गायकवाड व उपसभापतीपदी काँग्रेसच्या राजश्री काळे, अहमदपूर सभापतीपदी भाजपचे गंगासागर जबाडे तर उपसभापतीपदी भाजपचे बंडखोर बालाजी गुट्टे यांची वर्णी लागली आहे.
रेणापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे रमेश सोनवणे तर उपसभापतीपदी अनंत चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे. जळकोटच्या पंचायत सभापतीपदी बालाजी ताकबिडे तर उपसभापतीपदी सुनंदा धर्माधिकारी यांची निवड झाली आहे. शिरूर अनंतपाळ समितीच्या सभापतीपदी भाजपचे डॉ. नरेश चलमले व उपसभापती पदी उद्धव यादव या दोघांची बिनविरोध निवड झाली आहे. देवणीत सभापतीपदी भाजपच्या चित्रकला धनाजी बिरजदार तर उपसभापती पदाच्या तिन्ही अर्जामध्ये सूचक नसल्याने हे अर्ज बाद झाले आहेत. चाकूरच्या पंचायत समिती सभापतीपदी भाजपच्या जमुना बडे तर उपसभापती पदी सज्जन लोनाळे यांची वर्णी लागली आहे.