लातूर - निवडणुकीचा निकाल भाजपा-एनडीएच्या बाजूने असल्याचे लक्षात येताच 'ईव्हीएम मशीन घोटाळा हा ठरलेलाच आरोप आहे', असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना लगावला आहे. मात्र, या सर्व निकलांमध्ये जनतेची भूमिका महत्वाची असते आणि त्यामुळेच बिहारमध्येही भाजप-एनडीएचा विजय निश्चित असल्यााच विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
लातूरमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या बैठकीसाठी चंद्रकांत पाटील दाखल झाले होते. त्यांनी उस्मानाबाद, हिंगोली, नांदेड येथील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. बिहार विधानसभा निवडणुकीचे चित्र अस्पष्ट असले, तरी भाजपा-एनडीएचा विजय निश्चित आहे, असे ते म्हणाले. या निवडणुकीदरम्यान ईव्हीएम मशीन घोटाळ्याचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यावर बोलताना, सकाळी निकाल विरोधकांच्या बाजूने असताना ईव्हीएम मशीनचा मुद्दा समोर आला नाही, अस पाटील म्हणाले. मात्र, कल बदलताच ईव्हीएम मशीनचा मुद्दा समोर करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
हिवाळी अधिवेशन मुंबईतच
नागपूरचे हिवाळी अधिवेशन घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घराबाहेर पडावे लागेल, म्हणून टाळले जात असावे, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. हिवाळी अधिवेशन घ्यायचेच नसेल, तर मार्चमधील अर्थसंकल्पीय अधिवेशन हे नागपूरला घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. अधिवेशनात आणि अधिवेशनबाहेरही सरकारसोबत हा संघर्ष राहणारच आहे. आतापर्यंतच्या निर्णयप्रक्रियेत सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असे ते म्हणाले.
मराठा आरक्षण प्रकरण
मराठा आरक्षणवर वेळेत निर्णय न घेतल्यानेच स्थगिती मिळाली आहे. तर पीक नुकसनासंदर्भात मदतीचे आश्वासनही फोल ठरले आहे. पहिल्या टप्प्यात केलेली मदतही स्थानिक पातळीवर पोहचलेली नाही, असे पाटील म्हणाले.