लातूर : उस्मानाबाद जिल्ह्यातील सास्तुर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचे पडसाद लातुरात उमटले आहेत. यावरुन आता भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. गुन्हा नोंद होण्यास दिरंगाई केली जातेय तसेच यात आरोपींना राजकीय अभय मिळत असल्याचा आरोप देखील करण्यात आल्याने वादाला तोंड फुटले आहे. ही घटना गंभीर असूनही कारवाई होत नसल्याचे सांगत महिलांनी उमरगा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांना घेराव घातला होता.
अत्याचाराची घटना घडली त्या दरम्यान पीक नुकसानाची पाहणी करण्या साठी मुख्यमंत्री जिल्ह्यात दौऱ्यावर आले होते. त्यामुळे गुन्हा नोंद करून घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी केला होता. त्यांनतर मुलीच्या नातेवाईकांचे जबाब घेण्यात आले आहेत. मात्र, घटना गंभीर असतानाही याकडे दुर्लक्ष करण्यात का आले, असा सवाल भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला होता.
पीडित मुलीवर लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी रात्री उमरगा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले हे शासकीय रुग्णालयात आले असता महिलांनी त्यांना घेराव घालून जाब विचारला. यावेळी भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी यांच्यात बाचाबाची झाली. 9 वर्षीय मुलीवर तिघांनी अत्याचार केला होता. या घटनेचा सर्वत्र निषेध होत असून आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, कारवाईस दिरंगाई का होतेय असा सवाल उपस्थित करीत आता राजकारण पेटू लागले आहे.