लातूर- शहरात उभारण्यात येणाऱ्या नाट्यगृहास अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर झाला होता. असे असताना महापौर यांनी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत पहिला ठराव रद्द करत या नाट्यगृहास श्रीराम गोजमगुंडे यांचे नाव देण्याचा ठराव घेतला आहे. यावरून काँग्रेस-भाजपात वाद निर्माण झाला आहे. या नावाला विरोध करत आज भाजपच्या नगरसेवकांनी मनपासमोर ठिय्या आंदोलन केले.
हेही वाचा- राज्यभर 'वंचित'च्या महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद; कुठे दगडफेक, तर कुठे रास्ता रोको
शहरातील जिल्हाधिकारी कार्यालायलगत नाट्यगृहाचे बांधकाम सुरू आहे. मात्र, या नाट्यगृहाला मंजुरी मिळाल्यापासून हे वादाच्या भोवऱ्यात आहे. भाजपची मनपात सत्ता असताना याच नाट्यगृहाला दिवंगत नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. मात्र, ४ महिन्यांपूर्वी सत्तांतर झाले. दोन दिवसांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत याच नाट्यगृहाला श्रीराम गोजमगुंडे यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
नामांतराच्या मुद्द्यावरून हा वाद पेटला असून आज मनपा समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. सत्ताधाऱ्यांनी हा ठराव तत्काळ मागे घ्यावा, अन्यथा प्रजासत्ताक दिनी होणारा पालकमंत्र्यांचा नागरी सत्कार कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा भाजपच्या वतीने देण्यात आला होता. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. यावर निर्णय नाही झाल्यास आमदार अमित देशमुख यांचा नागरी सत्कार समारंभ होऊ देणार नाही, अशी भूमिका भाजपकडून घेण्यात आली आहे.