लातूर - महानगपालिकेच्या निवडणुकीत आज वेगळेच समीकरण पाहायला मिळाले. तसे पाहिल्यास गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपा आणि काँग्रेसमधील मतभेद सर्वश्रुत आहेत. पण महानगरपालिकेतील महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपच्या दोन नगरसेवकांनी चक्क काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान दिले आणि निवडणुकीचा निकालच फिरवला. यानंतर वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. मात्र, शहराच्या विकासासाठी आणि पाणीप्रश्न कायमचा मिटवा याकरिता हा निर्णय घेतला असल्याचे चंद्रकांत बिराजदार यांनी सांगितले. असे असले तरी त्यांनी उपमहापौर पद पदरी पाडून घेतले हे ही तेवढेच खरे.
महापौर -उपमहापौर निवडणूक प्रक्रिया सुरू होताच अनेक खलबते या सभागृहात पार पडली. अर्ज मागे घेण्याच्या अवघ्या १५ मिनिटांमध्ये राजकीय खेळ्या पार पडल्या. दरम्यान, भाजपाचे उपमहापौर देविदास काळे यांनी अर्ज मागे घेतला. समोरासमोर असलेल्या विक्रांत गोजमगुंडे आणि शैलेश गोजमगुंडे यांच्यात थेट लढत झाली. सुरवातीला विक्रांत गोजमगुंडे यांचे नाव पुकारताच सभागृतील ६८ नगरसेवकांपैकी ३५ जणांनी त्यांना मतदान दिले आणि चित्र स्पष्ट झाले. मात्र, काँग्रेसचे ३३ नगरसेवक असतानाही ३५चा आकडा गाठला. यामध्ये भाजपाचे नगरसेवक चंद्रकांत बिराजदार आणि गीता गोड यांनी काँग्रेसला मतदान केले होते. गेल्या अडीच वर्षात मनपा कर्मचाऱ्यांचे प्रश्न लागलेले नाहीत. शिवाय लातूरचा पाणीप्रश्न अद्यापही कायम असल्याने काँग्रेसला साथ दिल्याचे बिराजदार यांनी सांगितले. संख्याबळ अधिकचे असतानाही तहात काँग्रेस वरचढ ठरले आहे. ऐन वेळी भाजपच्या दोन नगरसेवकांनी बदलेल्या भूमिकेची चर्चा मात्र आता जोरात रंगू लागली आहे.
दरम्यान, काँग्रेसला मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई करणार असल्याचे संकेत भाजपा गोटातून देण्यात आलेले आहेत.