लातूर - जिल्ह्यात भर पावसाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मांजरा धरणातील पाणी पुरवून वापरण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाला अनेक निर्णय घ्यावे लागत आहे. सध्या शहराला 15 दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत असला तरी या धरणातील 4. 5 दलघमी पाण्याचा योग्य वापर व्हावा शिवाय पाणी गळतीला आळा बसावा, यादृष्टीने नळाने नाही तर टँकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे 1 ऑक्टोबर पासून 180 टँकर शहरात धावणार आहेत. तर प्रत्येक कुटुंबास 200 लिटर पाणी दिले जाणार आहे.
हेही वाचा - शेअर बाजारासह निफ्टीने गेल्या दहा वर्षाचा 'हा' मोडला विक्रम
शहराला मांजरा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, धरण क्षेत्रात पाऊसच झाला नसल्याने सध्या पाणीसाठा हा मृतावस्थेत आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच शहराचा पाणीपुरवठा 10 दिवसांवर करण्यात आला होता. त्यानंतर 15 दिवसावर आणि आता भविष्यातील टंचाई लक्षात घेता नळाचे पाणी बंद करून टँकरने फक्त 200 लिटर पाणी दिले जाणार आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अनेक पर्याय राबिवले. मात्र, पावसाने पाठ फिरविल्याने ही नामुष्की ओढवली आहे. या पद्धतीने पाणीपुरवठा केल्यास डिसेंबर अखेरपर्यंत पाणी पुरेल, असे पाणीपुरवठा अधिकारी सतीश शिवणे यांनी सांगितले आहे.
यंदा सरासरीच्या तुलनेत केवळ 52 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे खरिपातील पिके तर हातची गेलीच आहेत. ग्रामीण भागातही हीच अवस्था असल्याने दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत आहे.