लातूर - भाजपकडून उमेदवारी जाहीर होताच नाराजांनी बंडखोरीचे हत्यार उपसले आहे. मात्र, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे निकटवर्तीय मानले जाणारे भाजपचे जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बजरंग जाधव यांनी बंडखोरी केली आहे. त्यांच्या या बंडखोरीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे उमेदवारी मिळालेल्या अभिमन्यू पवार यांना नेमका विरोध कुणाचा अशी चर्चा रंगू लागली आहे.
संबंध जिल्ह्याची उत्कटता शिगेला पोहोचली होती की औसा मतदारसंघातून उमेदवारी कुणाला मिळणार. अखेर आज परंपरागत शिवसेनेची ही जागा भाजपला सोडण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी स्वीयसहाय्यकांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. मात्र, येथील भूमीपुत्रच आपला प्रतिनिधी असावा अशी मागणी औसेकरांची आहे, असे म्हणत जि.प. सदस्य बजरंग जाधव यांनी तयारी सुरू केली होती. शिवाय प्रचारही सुरू केला होता. मात्र, मंगळवारी भाजपची पहिली यादी जाहीर झाली असून यामध्ये औसा मतदारसंघासाठी अभिमन्यू पवार यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. दुसरीकडे बजरंग जाधव यांनी बंडखोरी केल्याने यामागे नेमके कारण काय? असा सवाल उपस्थित होत आहे. बजरंग जाधव हे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे निकटवर्तीय आहे. त्यांचा शब्द त्यांच्यासाठी प्रमाण असतानाही हे बंडखोरीचे अस्त्र का असा सवाल कायम आहे.